बीड: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच एका शेतकऱ्याने पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
सुरेश शिवाजी उपाडे (वय ३२,रा. रेवली ता. परळी) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलांसह त्यांना दोन काका आहेत. मात्र, एका काकांच्या निधनानंतर दुसऱ्या काकाने तीनऐवजी दोनच वारसदार दाखवून वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल केल्याचा सुरेश उपाडे यांचा आरोप आहे. जमिनीच्या तीन वाटण्या समान हिस्स्यात कराव्या, यासाठी ते तलाठी व तहसील कार्यालयात खेटे मारत होते.
काही दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र, न्याय न मिळाल्याने त्यांनी आत्महदहन करण्याचा इशारा दिला होता. ध्वजारोहण सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरेश उपाडे हे हातात पेट्रोलची कॅन घेऊन आले. पेट्रोल अंगावर ओतत असतानाच शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. केतन राठोड, गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच सिरसाळा ठाण्याचे अंमलदार तुषार गायकवाड, आशुतोष नाईकवाडे यांनी त्यांना ताब्यात घेतले. कॅन व काडीपेटी हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर ठाण्यात नेले. तेथे पोलिसांनी सुरेश उपाडे यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.