- पुरूषोत्तम करवामाजलगाव : तालुक्यातील वाढती रेशीम शेतीच्या माध्यमातून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेऊन चांगले पैसे कमवत आहेत. दरम्यान, वेगळा प्रयोग करत चार महिन्यापूर्वी महाराष्ट्रात प्रथमच तालुक्यातील फाटे कुटुंबीयांनी रेशीम कोशांपासून हार बनवायला सुरुवात केली. या हाराला गणेशोत्सव व दिवाळीमध्ये चांगली मागणी होती. त्यानंतर परळी येथे झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देखील मुख्यमंत्र्याच्या सत्कारासाठी फाटे कुटुंबीयाने बनवलेली रेशीमचेच हार वापरण्यात आले .
माजलगाव तालुक्यातील टकारवाडी येथील प्रगतशील शेतकरी शिवराज फाटे यांनी २०११ पासून रेशीम शेतीची संकल्पना राबवली. स्वतः रेशीम शेती करून इतर शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केल्याने तालुक्यात रेशीम शेतीचे प्रमाण वाढले. या शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा रेशीम शेतीमध्ये चांगलाच फायदा होऊ लागला आहे. शिवराज फाटे यांची शेती पत्नी छाया पाहतात. तर मागील काही दिवसांपासून मुलगी प्रियांका देखील यात रस घेत आहे. तिने शक्कल लढवत रेशीम कोशांपासून हार बनविणे सुरू केले. सोलापूर येथील जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी यासाठी प्रोत्साहन दिले. गणेशोत्सवाच्या काळात हार पुणे, मुंबई, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरसह मोठ्या शहरात हारांना चांगली मागणी होती. त्यानंतर दिवाळीत देखील रेशीम हार चांगल्या भावात मोठ्या प्रमाणावर विकले गेले. दरम्यान, वजनाला हलके व आकर्षित हारांचा आता राजकीय कार्यक्रमांत मागणी वाढत आहे. सत्कारासाठी या हार, बुकेची मागणी मिळू लागले आहे. मंगळवारी परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी या रेशीम हाराची ऑर्डर दिली होती.
बाजारात कमी प्रतीच्या कोशातून भरघोस उत्पन्न चांगल्या रेशीम कोषाला सध्या किलोला ४५० रुपये पर्यंतचा भाव मिळत आहे. तर कमी प्रतीच्या कोषाला १५० रुपयांचा भाव मिळतो. या कमी प्रतीच्या कोशांपासूनच हार बनवण्यात येत आहेत. या हाराला बाजारात ४ हजारांपेक्षा जास्त भाव मिळू लागला आहे.
अनेकांना रोजगार दिला माझी मुलगी प्रियांका हिच्या संकल्पनेतून हार बनवणे सुरू केले. या हाराला चांगली मागणी मिळत आहे. यामुळे आम्हाला उत्पन्न वाढण्यास मदत झाली. तसेच अनेक महिलांना रोजगारही मिळू लागला.- शिवराज फाटे , रेशीम उत्पादक शेतकरी
महाराष्ट्रात प्रथमच प्रयोगआंध्रप्रदेश व कर्नाटक येथील शेतकरीच रेशीम हार बनवतात. परंतु महाराष्ट्रात प्रथमच हा प्रयोग फाटे कुटुंबीयांनी केला आहे. यात ते यशस्वी देखील झाले आहेत.- विकास मस्के , तांत्रिक अधिकारी
रोजगार निर्मिती झाली जे रेशीम कमी प्रतीचे आहेत, त्यास खूपच कमी भाव मिळतो अशा कोषांपासून हे हार बनवून चांगले उत्पन्न मिळते. टाकाऊ मालापासून चांगले उत्पन्न अन् रोजगार निर्मिती झाली.- शंकर वराट , जिल्हा रेशीम विकास अधिकारी , बीड
भरघोस उत्पन्न मिळवा महिला देखील रेशीम शेती शकतात. शिवाय घरबसल्या रेशीम कोशापासून हार, गुच्छ,राखी, किचन आदी साहित्य बनवून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकते- कु. प्रियांका शिवराज फाटे