बीड : कोणत्याही पक्षात अंतर्गत गटबाजी असते. अशीच भाजपमध्येही आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत सक्रिय असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या पंकजा मुंडे यांच्यापासून दुरावत चालले आहेत. जिल्हा नेतृत्त्वाकडून मान, सन्मान आणि संवाद साधला जात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. भाजपमध्ये असूनही माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, बीड तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा हा नाराज गट लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसते.
पंकजा मुंडे त्यांचा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद दुरावत गेला. २०१९ साली त्यांचा परळी मतदारसंघातून विधानसभेत पराभव झाला. त्यानंतर त्या फारशा सक्रिय नव्हत्या. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटतही नव्हत्या. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होत गेले. आज गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत असणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपमध्ये अजुनही पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्यासाठी समोर येताना दिसत नाहीत. याची जाणीव पंकजा मुंडे यांना आहे. कारण २४ एप्रिल राेजी अर्ज दाखल केल्यावर झालेल्या जाहीर सभेत पंकजा यांनी बोलूनही दाखवले होते. परंतु, अद्याप तरी नाराजांची मनधरणी न झाल्याने हे सर्व लोक भाजप आणि नेतृत्त्वापासून दूर असल्याचे दिसत आहे.
लाेक दुरावल्याचा विचार केला का? रमेश पोकळे हे ११ वर्षे भाजप जिल्हाध्यक्ष राहिले. ते सध्या किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. स्वप्नील गलधर हे सध्या भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत. हे दाेघेही भाजप पदाधिकारी असताना पंकजा यांच्या प्रचारात सक्रिय नाहीत. एवढे सारे लोक का दुरावले? याचा विचार नेतृत्त्वाने न केल्यानेच हे चित्र आहे.
आम्ही रूसलो आहोत, हे समजायला चार वर्षे का लागली?जिल्हा नेतृत्त्वाचा कसलाही संवाद नाही की फोन नाही. संघटनात्मक बैठकांना बोलावले जात नाही. मान, सन्मान नाही. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून सर्वांना समान वागणूक दिली जात होती. सर्वांना जीव लावला जात होता. आताची नाराजी ही पदासाठी किंवा गुत्तेदारीसाठी नाही. आमच्याकडे काही तरी स्वाभिमान आहे, म्हणून आहे. सध्या तरी आम्ही मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात सक्रिय आहोत. बाकी वेळ आल्यावर सर्व काही स्पष्ट करू.- रमेश पोकळे, प्रदेश उपाध्यक्ष, किसान सेल