अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई तालुक्यात सहा वर्षीय बालिकेवर साठ वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महिला दिनी पडसाद उमटले. महिला संघटनांनी व शालेय विद्यार्थिनींनी या अत्याचार प्रकरणी पुढाकार घेत मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात शहरातील विविध शाळां-महाविद्यालयातील मधील विद्यार्थी शिक्षिक प्राध्यापकांसह राजकीय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली.
अंबाजोगाई तालुक्यातील सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना नुकतीच घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या वृद्ध नराधमाला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी तालुक्यातील सर्व महिला संघटना, शाळा, महाविद्यालयामधील मुली, शिक्षक- प्राध्यापक, राजकीय, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते यांच्या सहभागासह उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यार्थीनींनी दिले निवेदन :मोर्चेकऱ्यांच्यावतीने मोर्चात सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थीनींनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना दिले.