- नितीन कांबळेकडा- उसतोडणीसाठी फडात जायचे असल्याने सकाळी कामात व्यस्त असणाऱ्या आईच्या आजूबाजूस खेळणाऱ्या दीड वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या बादलीत बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना चोभानिमगांव येथे बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली. कानिफनाथ शिवाजी मिरास असे मृत दीड वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे.
परभणी जिल्ह्य़ातील जिंतूर तालुक्यातील वडळी येथील शिवाजी मिरास हे पत्नी व दीड वर्षाच्या मुलासह तीन महिन्यांपासून अंबालिका सहकारी साखर कारखाना राशिन या ठिकाणी ऊसतोडी करत आहेत. हे मजुर दाम्पत्य लेकराबाळासह आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव येथील थेटे वस्तीवर झोपड्या टाकून वास्तव्यास आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे ऊसाच्या फडात जाण्यासाठी कामाची आवराआवर करत होते.याच वेळी दीड वर्षाचा कानिफनाथ आईच्या शेजारी खेळत होता.
दरम्यान, खेळता खेळता अचानक तोल गेल्याने कानिफनाथ पाण्याच्या बादलीत बुडाला. काम आवरल्यानंतर आई मुलाला शोधत असताना तिला कानिफनाथचा मृतदेह बादलीत आढळून आला. चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.