बीड : जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीका, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विनयभंग, पोलिसांना मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, जबरी चोरी, लुटमारीसारख्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपीने जिल्हा रूग्णालयात जावून दारू पिऊन चक्क परिचारीकेला मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू आहे.
व्यंकट उर्फ व्यंक्या रावसाहेब उगले (रा.पालवण ता.बीड) असे या कुख्यात आरोपीचे नाव आहे. जिल्हा रूग्णालयात शुक्रवारी रात्री ८ ते शनिवारी सकाळी ८ या वेळेत रंजना दाने यांची ड्यूटी होती. त्या नाईट सुपर म्हणून कर्तव्यावर होत्या. अपघात विभागातील माहिती घेतल्यानंतर त्यांनी इतर वॉर्डचा राऊंड घेत होत्या. याचवेळी व्यंक्या दारूच्या नशेत तर्रर्र होऊन तेथे आला. कर्तव्यावरील परिचारीकांना शिवीगाळ करून हुज्जत घालत असताना दाने यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने दाने यांनाच मारहाण केली. यामध्ये त्यांच्या नाकाला जखम झाली आहे. त्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वता:ची सुटका करून घेत थेट बीड शहर पोलिस ठाणे गाठले. रात्री साडे दहा वाजेपर्यंत त्या शहर ठाण्यात बसून होत्या. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरकाही दिवसांपूर्वी अपघात विभागातील एका ब्रदरला मारहाण झाली होती. त्यानंतर एका डॉक्टरशीही हुज्जत घातल्याचा प्रकार घडला होता. तेव्हा परिचारीकांनी आक्रमक होत सुरक्षेची मागणी केली. येथे २४ तास बंदुकधारी पोलिस कर्मचारी नियूक्तही करण्यात आला. परंतू नंतर याचा सर्वांनाच विसर पडला आणि हे पोलिस गायब झाले. त्यामुळेच गुन्हेगारांचा रूग्णालयात वावर वाढला आणि परिचारीका, डॉक्टरांवर हात उचलण्याची हिंमत होऊ लागली. या घटनेने पुन्हा एकदा रूग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.