परळी ( बीड) : तालुक्यातील दाऊतपूर येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच मागील तीन दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या वीज निर्मितीत घट झाली आहे.
महाराष्ट्र राज्य निर्मिती कंपनीच्या परळी येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्र मध्ये 250 मेगावॉट क्षमतेचे तीन संच आहेत. या तीन संचापैकी एक संच बंद आहे, तर दोन संच चालू आहेत .एकूण 750 मेगावॉट क्षमतेच्या तीन संचा पैकी एक संच बंद असल्याने वीज निर्मितीत घट झाली आहे. लवकरच बंद असलेला एक संच चालू करून वीज निर्मिती क्षमते एवढी करण्यासाठी केंद्रातील अधिकारी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी दिली.
यासोबतच, आजपासून वीज कर्मचारी संपावर गेल्याने वीज निर्मितीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडचण आणि संप अशा दुहेरी संकटात विजेची निर्मिती कमी झाली तर लोडशेडिंग पुन्हा सुरु होऊ शकते.