-मधुकर सिरसटकेज: केज-बीड महामार्गावरील सांगवी (सारणी )पुलावर बुधवारी रात्री 9:50 वाजण्याच्या दरम्यान नांदेड येथून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव खाजगी बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
नांदेड येथून पुण्याकडे जाणारी खाजगी बसन ( क्रमांक एम एच 24/ एफ 7576 ) केजकडे येणाऱ्या दुचाकीस (क्रमांक एम एच 25/ जे 2856 ) ला सांगवी नदीवरील पुलावर समोरासमोर जोराची धडक दिली. अपघात एवढा भयंकर होता की, दुचाकीचा बस खाली येऊन चुराडा झाला. एका मयताचे डोके धडा पासून वेगळे झाले होते.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उप निरीक्षक वैभव सारंग व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे. दुचाकीस्वार दोन्हीही मृतांची ओळख अद्याप पटली नाही.
समोरासमोर धडक दुसरी घटना
आज केज तालुक्यातील समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघाताची ही दुसरी घटना आहे. दुपारी तीन वाजताच केज, कळंब महामार्गांवर दोन वाहनाची समोरासमोर धडक होऊन तिघे जण जखमी झाले आहेत.त्यांच्यावर कळंब येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत