धारूर (जि. बीड) : तालुक्यातील हिंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडी शिजविणारी महिला कामगार आणि एका शिक्षिकेमध्ये वाद झाला. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात दोघींनी अक्षरशः एकमेकींचे केस ओढत मारहाण केली.
हिंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी वर्गात ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. परंतु पोषण आहार शिजविणाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना पुरेशी खिचडी न देणे, बिस्किटे देण्याच्या दिवशी दोन बिस्किटांवर बोळवण करणे, दर्जेदार आहार न देता ओबडधोबड प्रमाणात विद्यार्थ्यांच्या ताटात खिचडी टाकणे असे प्रकार होत होते. याबाबत दोन आठवड्यांपूर्वी एका शिक्षिकेने पोटभर पोषण आहार देण्याची सूचना केली होती. २८ जुलै रोजी या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना किमान दोन बिस्किटे देण्याची व पुरेसा आहार देण्याची सूचना केली. त्यानंतर पोषण आहार कामगार महिलेने शिक्षिकेसोबत हुज्जत घालत मारहाण केली.
अहवाल मागविला -गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांच्याशी संपर्क केला असता, आम्हाला उशिरा हे समजले. संबंधित केंद्रप्रमुखांकडून या प्रकरणी अहवाल मागवला असून तत्काळ वरिष्ठांना कळविले जाईल, असे त्यांनी सांगितले.