पुरूषोत्तम करवा
माजलगाव : येथील नगर परिषद अगोदरच कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात बदनाम झाली असताना अजूनही येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोके ठिकाणावर आलेले नसून, नगर परिषदेच्या विविध करापोटी वसूल करण्यात आलेले तब्बल ३३ लाख रुपये तीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या हातावर असून, मागील चार महिन्यांपासून ही रक्कम नगर परिषद तिजोरीत न भरता स्वतःच वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माजलगाव नगर परिषदेचा अनागोंदी कारभार व भ्रष्टाचाराची अगोदरच लक्तरे वेशीला टांगली गेलेली आहेत. त्या प्रकरणात ४ कर्मचारी अद्याप तुरुंगात खितपत पडलेले आहेत. असे असताना कायमस्वरूपी असोत की, रोजंदारीवरील कर्मचारी असोत, कसे काय बिनदिक्कतपणे नगर परिषदेच्या विविध करापोटी वसूल केलेले लाखो रुपये वापरू शकतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिषदेने जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात मालमत्ता व विविध कर तसेच पंतप्रधान आवास योजनेत मंजूर लाभार्थ्यांकडून लाखो रुपये घरपट्टी वसूल केली. वसुलीसाठी सहा महिन्यांपासून नगर परिषदेचे ४ - ५ रोजंदारी कर्मचारी नियुक्त आहेत. त्यांच्याकडे पावती पुस्तके आहेत. त्यांनी साडेचारशे लोकांकडून वसुली केली.
शिपाई, लिपिकाचा समावेश
जानेवारी, फेब्रुवारीपासून आतापर्यंत तीन कर्मचारी पांडुरंग कुलकर्णी (शिपाई) १९ लाख ३२ हजार ११० रुपये, चंद्रकांत बुलबुले (शिपाई) ६ लाख ९५ हजार ५७५ रुपये, भुजंग गायकवाड (लिपीक) ७ लाख पन्नास हजार रुपये असे एकूण ३३ लाख ४० हजार रुपये त्यांनी वसूल केलेले आहेत. मात्र, त्यांनी नगर परिषदेच्या खात्यात भरलेच नाहीत. याबाबत बाहेर चर्चा होताच मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या कर्मचाऱ्यांना ७ मे रोजी नोटीस बजावल्या आहेत.
३३ लाख कोणाच्या खिशात?
सदरील नोटीस बजावलेले कर्मचारी एवढे रुपये स्वतः वापरू शकत नाहीत. नगर परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात वसुलीचे पैसे कर्मचाऱ्यांच्या नावावर व वापरणारा दुसराच असायचा, अशी पद्धत आहे. त्यामुळे ३३ लाख रुपये कोणाच्या खिशात गेले, याची सखोल चौकशी करावी लागणार आहे.
वचकच नाही
माजलगाव नगर परिषदेचा इतिहास पाहता येथे चांगला अधिकारी म्हणून विशाल भोसले यांच्यावर आ. प्रकाश सोळंके यांनी मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. मात्र, भोसले यांचा कर्मचाऱ्यांवरच वचक राहिला नाही, असे दिसून येते. मागील आठवड्यात अंत्यविधीच्या कारणावरून कर्मचाऱ्यांमध्ये झालेली मारामारी हे त्याचेच उदाहरण आहे. भोसले हे सहा महिन्यांपासून येथे असताना चार महिन्यांचे पैसे जमा का केले गेले नाहीत, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
---------
नोटीस बजावल्या
एकत्रित मानधनावरील तीन कर्मचाऱ्यांनी वसुलीचे पैसे हातावर ठेवल्याने मागील आठवड्यात त्यांना नोटीस बजावली आहे. ही रक्कम त्यांनी १५ मेपर्यंत न भरल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील.
--- विशाल भोसले, मुख्याधिकारी.