बीड : जिल्ह्यात दोन दिवस आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु यात मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या खासगी कंपनीच्या गलथान कारभारामुळे एकाच उमेदवाराला एकच वेळ आणि वेगवेगळे परीक्षा केंद्र आले आहेत. तसेच हॉल तिकिटावरही अनेक चूक असल्याचे उदाहरणे आहेत. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने गट -क आणि -ड पदासाठी शनिवारी व रविवार असे दोन दिवस परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया आरोग्य विभागाने एका खासगी कंपनीवर सोपविली आहे. दोन दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाने ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याचा दावा केला होता. परंतु परीक्षार्थींच्या हाती हॉल तिकीट पडताच अनेक चुका समोर आल्या आहेत. एकाच विद्यार्थ्याचे वेगवेगळे बैठक क्रमांक, नाव एकाचे आणि फोटो दुसऱ्याचा, एकाचवेळी दोन परीक्षा केंद्र, लिंग बदल असे अनेक चुका दिसून आल्या. तर काही ठिकाणी परीक्षा केंद्राचा पत्ताच अर्धवट असल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे परीक्षार्थी गाेंधळून गेले आहेत. याची तक्रार कोणाकडे करायची आणि कशी करायची? याबाबतही काहीच सूचना नसल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षापासून वंचित राहणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खासगी कंपनीविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.
---
आम्हाला केवळ नियोजन करण्याच्या सूचना आहेत. मी पण चुका झाल्याचे ऐकले आहे, परंतु अद्याप माझ्याकडे कोणी तक्रार केली नाही. मी केवळ नोडल ऑफिसर आहे. जो काही गोंधळ झाला असेल त्याबाबत मी काहीच बोलू शकत नाही.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
--
गट ‘क’ आणि ‘ड’ पदासाठी शनिवार व रविवारी परीक्षा होत आहेत. यात ज्या काही चुका आहेत, त्याबाबत मी काहीच बोलू शकत नाही. मी जिल्हास्तरावरील समन्वयक आहे. याबाबत मला पण वरिष्ठांना विचारावे लागेल. चुका दुरुस्तीबाबत मलाही काही सूचना नाहीत.
-अमोल पवार, जिल्हा समन्वयक, न्यासा कंपनी
---
जिल्ह्यातील एकूण केंद्र ५८
एकूण परीक्षार्थी - १७१६२
केंद्रांचे ठिकाण - बीड, अंबाजोगाई, गेवराई आणि परळी
--