दिंद्रुड :
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील पोलीस वसाहतीची अठरा लाख रुपये थकबाकी असून थकीत वीजबिल वसुली चालू असल्याने पाच दिवसांपासून पोलीस वसाहत अंधारात आहे.
पोलीस वसाहतीतील रहिवासी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थकीत वीजबिल भरले नसल्या कारणाने वीज महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.
यापूर्वी वास्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचेही वीजबिल थकबाकी आहे असे येथील काहींनी सांगितले आहे. मात्र ही थकबाकी पोलीस कर्मचाऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून पोलीस कर्मचारी परिवारासह अंधारात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
दिंद्रुड पोलीस वसाहतीत १४ मीटर आहेत. सद्या वसाहतीत आठ पोलीस कर्मचारी राहत असून चार पोलीस कर्मचाऱ्यांचे वीजबिल लाखांच्या घरात बाकी असल्यामुळे वीज महावितरणने गेल्या आठ दिवसांपूर्वी बाकी असणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला होता.
सदरील दिंद्रुड पोलीस वसाहतीचे मीटर व त्यावरील थकीत वीजबिल बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे नावावर आहे. तब्बल अठरा लाख आठ हजार चारशे तेरा रुपये एवढी थकबाकी असल्याची माहिती महावितरणकडून कळली आहे. एकीकडे महावितरण हजारांवर थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची रक्कम वसुली करण्यासाठी तोंडाला आलेले उभे पीक जळत शेतीचे वीज तोडणी करते तर एकीकडे लाखोंची थकबाकी असताना देखील इतके दिवस डोळेझाक केली जाते. मात्र शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची पर्वा न करता सक्तीने वीजबिल वसुली करतात. ही बाब अतिशय गंभीर असून संबंधितांनी याची दखल घेतली पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.
आम्ही पोलीस वसाहत दिंद्रुड येथील काही कर्मचाऱ्यांचे चालू बिल बाकी भरुन घेतली आणि वीज जोडून दिलेली आहे. राहिलेली अठरा लाख थकबाकी वसुलीसाठी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना ३१ जानेवारीला पत्र दिलेले असून वीजबिल वसुलीसाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.
- उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.उपविभाग तेलगाव.