लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा क्रीडा कार्यालयातील अंतर्गत मुख्य रस्त्यावर कँटीन उभारून रस्ता बंद केला. याबाबत कारवाई तर दूरच; क्रीडा कार्यालयाकडून साधी नोटीस पाठविण्याची तसदीही घेतलेली नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडा अधिकारी यांच्याकडून या प्रकरणाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे उघड झाले आहे.जिल्हा क्रीडा संकुलात बांधा वापरा व हस्तांतरित करा, या तत्वावर अनिल डायगव्हाणे नामक व्यक्तीला जलतरण तलावासाठी जागा दिली होती. या जागेवर त्यांनी तलाव उभारला, परंतु बाजूने जाणारा रस्ताही बंद करून त्यावर कँटीन उभारली. मागील सात वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना क्रीडा अधिकाऱ्यांनी सदरील कंत्राटदाराला साधी नोटीसही पाठविली नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे व संबंधित क्रीडा अधिकारी एन.बसे यांच्याकडे याबाबत वारंवार तक्रारीही करण्यात आल्या. परंतु त्यांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी खुरपुडे या सध्या आजारी रजेवर आहेत. त्यामुळे हे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले आहे, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले. तर क्रीडा अधिकारी बसे यांनी आपण डायगव्हाणे यांना नोटीस पाठविलेली नाही, असे सांगितले. यावरून डायगव्हाणे यांना क्रीडा कार्यालय कशा प्रकारे हातभार लावत आहे, याचा प्रत्यय येतो.रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी खुरपुडे व क्रीडा अधिकारी बसे यांचीही चौकशी करण्याची मागणी क्रीडा पे्रमींमधून होत आहे.
अतिक्रमण करणाऱ्याला क्रीडा कार्यालयाचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:59 AM