बीड: आरोग्य विभाग, टीईटी पेपरफुटीत डझनभर लोकांचा सहभाग आढळल्याने बीड चर्चेत होते. म्हाडा परीक्षेत बीडमध्ये तोतया परिक्षार्थ्याला पकडले होते. पाठोपाठ नागपूर येथील म्हाडा परीक्षेत देखील बीड कनेक्शन समोर आले आहे. बीडच्या परिक्षार्थ्याच्या जागी पेपर सोडवण्यासाठी गेलेल्या तोतया परिक्षार्थ्याने स्वाक्षरी करताना अभिषेक ऐवजी अभिषेका असे लिहिले त्यामुळे त्याचा भंडाफोड झाला. बीडमधून मूळ परिक्षार्थ्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने नागपूर पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.
नागपूर येथे म्हाडाच्या अभियांत्रिकी पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी ९ फेब्रुवारी रोजी परीक्षा झाली. यावेळी नागपूरच्या एमआयडीसी आयकॉन डिजिटल झोन क्र. २ मध्ये परिक्षार्थ्यांना आत सोडताना कागदपत्रे तपासणी सुरू होती. स्डिजिटल स्वाक्षरी पडताळताना अभिषेक याच्या स्वाक्षरीत तोतया परिक्षार्थ्याने अभिषेका केले. त्यामुळे स्वाक्षरी जुळेना. बनावट परिक्षार्थ्याने आपण पकडले जाऊ, या भीतीने तिथून पोबारा केला. त्याचे नाव समोर आले नाही. मात्र अज्ञात तोतया परीक्षार्थीसह मूळ परिक्षार्थ्यावर नागपूर एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील मूळ परीक्षार्थी अभिषेक भारतराव सावंत (२८, आहेर चिंचोली ता. बीड, हमु.शाहूनगर, पाण्याच्या टाकीजवळ, बीड) यास १० रोजी अटक करण्यात आली आहे. नागपूर एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांसह शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक बाळराजे दराडे, पो. ना. विष्णू चव्हाण, शिवनाथ उबाळे, रवींद्र आघाव, सचिन आगलावे यांनी आहेर चिंचोली येथे त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत तोतया परिक्षार्थ्याचा खुलासा होणार असून मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते.