गेवराई : मुलीला फूस लावून पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी सतत अत्याचारामुळे गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात करून पीडित मुलीच्या आईचा दोन वेळा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मात्र फरार आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावात ऊसतोड मजुरी करणारी ३५ वर्षीय महिला ही दोन मुले व १६ वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहे. दरम्यान घराशेजारीच राहणारा आकाश सोनवणे याने १५ मार्च २०२० रोजी १६ वर्षीय मुलीला फूस लावून तसेच लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. तसेच तिच्यावर सतत शारीरिक अत्याचार केला. यानंतर गावी परत येऊन आमचे लग्न लावून द्या म्हणत आकाश सोनवणे हा सातत्याने जिवे मारण्याची धमकी देत होता. यादरम्यान मुलगी गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात केला. त्यानंतरदेखील आरोपीने पीडित मुलीच्या आईचा २५ जून २०२१ व २२ जुलै २०२१ रोजी दोन वेळा बळजबरीने विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आकाश सोनवणे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार तसेच विनयभंगप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पिंक मोबाइल पथक प्रमुख उपनिरीक्षक अर्चना भोसले या करत असून आरोपी मात्र फरार आहे.