बीड : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पतीने गोळ्या खायला देऊन पत्नीचा गर्भपात केला. त्यानंतर बेल्टने मारहाण करून हुंड्यासाठी अनन्वित छळ करण्यात आला. शहरातील एका सुशिक्षित कुटुंबात हा सगळा प्रकार घडला. याबाबत १८ नोव्हेंबरला पतीसह सासू, सासऱ्यावर फसवणूक, संमतीशिवाय गर्भपात व कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सुचिता ऋषीकेश नागरगोजे (रा. गजानन विहार, कालिकानगर, बीड) असे विवाहितेचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे माहेर शिरूर आहे. १२ मे २०१९ रोजी त्यांचा विवाह ऋषीकेश नागरगोजेशी झाला. ऋषीकेश हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी आहे. सासरा भागवत दशरथ नागरगोेजे जिल्हा रुग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी असून सासू अनिता भागवत नागरगोजे शिरूर तालुक्यात जि.प. शाळेत शिक्षिका आहे. लग्नात सुचिताच्या आई-वडिलांनी सहा लाख १७ हजार १९९ रुपयांचे १९ तोळे दागिने व संसारोपयोगी साहित्य दिले होते. लग्नानंतर १५ दिवसांनी ऋषीकेश उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे नोकरीसाठी गेला. इकडे सुचिता सासू-सासऱ्यांकडे राहत होती. लग्नात मानपान दिला नाही, लग्नात अतिरिक्त दोन लाख खर्च झाले, या कारणावरुन तिला ते टोमणे मारत.
दरम्यान, नोव्हेंबर २०२० मध्ये ऋषीकेशची रत्नागिरी येथे बदली झाली. सुचिताला घेऊन ऋषीकेश खंडाळा (जि. रत्नागिरी) येथे गेला. ती गर्भवती झाल्याचे कळाल्यावर ऋषीकेशने दवाखान्यात नेले नाही. सतत दीड महिना त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या खायला दिल्या. २६ जानेवारी २०२१ रोजी रक्तस्राव वाढला. त्यानंतर २८ जानेवारी २०२१ रोजी तिचा रत्नागिरीतील एका खासगी दवाखान्यात सात आठवड्यांचा गर्भ खाली केला. यानंतर सुचिताने तुम्ही कोणत्या गोळ्या खायला दिल्या, असे विचारले असता त्याने बेल्टने मारहाण करून मला तुझ्यापासून वारसदार नको, असे म्हणत बीडला पाठवून दिले.
गाळा खरेदीसाठी दहा लाख रुपये आण असे म्हणून तिचा छळ सुरू झाला. एप्रिल २०२२ रोजी सुचिता यांना घरातून हाकलून दिले. तेव्हापासून त्या माहेरी राहतात. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी नातेवाइकांची बैठक झाली. यात सासरच्या लोकांनी नांदविण्यास नकार दिला. त्यानंतर सुचिताने शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून पती ऋषीकेश, सासरा भागवत व सासू अनिता नागरगोजे यांच्यावर गुन्हा नोंद झाला.
सासू- सासऱ्याची नोटीसवर सुटकादरम्यान, १९ नोव्हेंबरला सासरा भागवत व सासू अनिता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक अमोल गुरले, अंमलदार सचिन साळवे यांनी त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी कलम ४१ नुसार नोटीस देऊन आवश्यक तेव्हा तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर सुटका केली. पती ऋषीकेश नागरगोजेचा शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक अमोल गुरले यांनी सांगितले.
घरात स्कार्फ, परफ्यूम...१९ जानेवारी २०२१ रोजी ऋषीकेशने सुचिताना लखनौला नेले. तेथे किरायाने केलेल्या घराची साफसफाई करताना तिला स्कार्फ, परफ्यूम व महिलांच्या वापराच्या वस्तू आढळल्या. तिने विचारणा केली तेव्हा तुला काय करायचे, असे म्हणत आपण परराज्यात आहोत, तूू नीट रहा, असे म्हणत मारहाण केली व १५ दिवसात परत बीडला पाठवले, असे सुचिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे.