यांत्रिकी शेतीमुळे शेतकऱ्यांच्या दावणीला बैलांचा अभाव
शिरूर कासार : अल्पभूधारक शेतकऱ्याजवळ किमान एक बैलजोडी तर मोठ्या शेतकऱ्याकडे सहा सहा आठ आठ बैल असायचे. त्यामुळे शेणखत मुबलक घरीच बनायचे; मात्र बदलत्या परिस्थितीनुसार आता यांत्रिकी शेती सुरू झाली. घंटो का काम मिनिटों में याप्रमाणे होत आहे. नांगरटीपासून थेट पेरणीपर्यंत ट्रॅक्टर तर खळे करण्यासाठी मळणी यंत्र आल्याने शेतकऱ्यांच्या दावणीला बैलांची संख्या नगण्य झाली असून, शेतकऱ्यांनाच आता पोळा सणाला मातीच्या बैलांची पूजा करण्याची वेळ आली आहे.
रस्त्याच्या अर्धवट कामामुळे साचते पाणी
शिरूर कासार : तालुक्यातून पैठण पंढरपूर, बीड चिंचपूर तसेच बीड ब्र. वेळंब मार्गे पाथर्डी अशा रस्त्याचे काम सुरू आहेत; मात्र काम चालू असलेल्या या रस्त्यावर सध्या पावसामुळे पाणी साचत असून, त्याचा मोठा त्रास प्रवाशांसह वाहनचालकांना होत आहे. वास्तविक उन्हाळ्यातच या कामाला गती मिळणे गरजेचे होते; मात्र तसे न झाल्याने त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
शिरूर तालुका झाला कोरोना सेंटरमुक्त
शिरूर कासार : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता अत्यल्प झाल्याने कोरोना सेंटर बंद करण्यात येत आहेत. त्यानुसार तालुका आता कोरोना सेंटरमुक्त झाला आहे. कोरोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर ज्यावेळी होती त्यावेळी शासकीय सेंटरशिवाय खासगी सेंटर सुरू करावे लागले होते. जसजशी रुग्णसंख्या घटत गेली तसतसे हे सेंटर बंद करण्यात आले. आता दोन दिवसांपूर्वी शासकीय कोरोना सेंटरही बंद केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी सांगितले.
पंचायत समितीचा कारभार डोळे झाकून सुरू
शिरूर कासार : कायमस्वरूपी गटविकास अधिकारीच नसल्याने प्रभारी कामकाज सुरू असले तरी एकाच अधिकाऱ्यावर तीन तीन कामांचे ओझे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी डोळे झाकून काम करत असल्याचे प्रत्ययाला आले. तक्रारकर्त्याने दिलेले पत्र आणि त्याला दिलेले उत्तर पाहता ही बाब निदर्शनास आली. १७ -८-२०२१ रोजी कामाच्या चौकशी मागणीचे तक्रार पत्र दिले होते. त्याला दिले जाणारे उत्तर हे पुढील तारखेस अपेक्षित असते; मात्र तसे न होता या पत्राला दिलेल्या कार्यवाहीच्या पत्रावर २६ -११- १९२० अशी मागील वर्षाची तारीख नोंदविल्याचे निदर्शनास आले. पंचायत समिती कागदी घोडे डोळे झाकून नाचवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.