लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अनधिकृत बांधकाम धारकांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बीड शहर पोलिसांना मंगळवारी पत्र दिले होते. केवळ पालिका व पोलिसांचा समन्वय नसल्याने २४ तासानंतरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. चौकशीच्या नावाखाली गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे तर आपल्याला पोलिसांचा फोन आला नाही, त्यामुळे आपण फिर्याद दिली नाही, असे पालिका सांगत आहे. या दोघांचे वाद अनधिकृत बांधकामधारकांना अभय देणारे ठरू पहात आहेत.बीड शहरात सध्या पालिकेच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे अनधिकृतपणे बांधकामे केली जात आहेत. हीच बांधकामे शोधण्यासाठी नवनियूक्त मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी विशेष स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली. यापूर्वी रखडलेल्या प्रकरणांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे बीड शहरातील कारंजा रोड परिसरात परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करणाºया सात ते आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी दोरकुळकर यांनी बीड शहर पोलिसांना पत्र दिले होते. शहर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करू, असे पालिकेला सांगितले.तर आम्ही पत्र देण्याचे काम केले आहे. अहवाल पाहिल्यावर कॉल करू, असे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे पालिकेच्या निरीक्षकांनी सांगितले. फिर्यादी बाजू असतानाही पालिकेला निमंत्रणाची आवश्यकता का भासावी, असा सवाल उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणांत पोलीस आणि बीड पालिका कर्मचाऱ्यांचा समन्वय नसल्यानेच २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे अनधिकृत बांधकाम धारक सावध झाले असून, त्यांनी कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
पोलीस-पालिकेत समन्वय नसल्याने अनधिकृत बांधकामधारकांना अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:17 AM