अंबाजोगाई : मास्क न लावता फिरणाऱ्या दुचाकीस्वाराला पथकाने अडविले आणि अँटिजेन चाचणी व दंडाची सूचना केली. यामुळे संतापलेल्या तरुणाने कोरोना नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत चाचणीला विरोध केला. ही घटना अंबाजोगाईतील सावरकर चौकात सोमवारी (दि.३) सकाळी घडली. याप्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनाकारण फिरणाऱ्या लोकांची अँटिजन चाचणी करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून बीड जिल्ह्यात सुरुवात झाली. यासाठी अंबाजोगाई शहरात पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी पावणेआठच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकासमोर वेणुताई महिला महाविद्यालयासमोर तहसीलदार विपीन पाटील, मुख्याधिकारी अशोक साबळे, तालुका आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे, महसूल व न.प.चे कर्मचारी, पोलीस हे अँटिजेन टेस्ट ड्राइव्हची कार्यवाही करत होते. यावेळी प्रवीण राजाभाऊ शेप (रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई) नामक तरुण विनामास्क त्याच्या दुचाकीवरून (एमएच २० बीबी ९२७३) सावरकर चौकाकडून येत होता. पथकाने त्याला अडवून अँटिजेन चाचणी आणि विनामास्क असल्याने दंड भरण्याबाबत सूचना केली. त्यामुळे संतापलेल्या प्रवीणने सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि अँटिजेन चाचणीला विरोध करत दहशत निर्माण केली. याप्रकरणी रमेश भानुदास सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण शेप याच्यावर कलम ३५३, ५०४, १८८ सह आपत्कालीन व्यवस्था कायद्यान्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.