बीड : आरा यंत्राच्या (सॉ मिल) परवाना नूतनीकरणासाठी, तसेच कारवाई न करण्यासाठी २७ व्यापाऱ्यांकडे प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ५४ हजार रुपयांची मागणी करून ५० हजार रुपये स्वीकारताना वनविभागाच्या फिरत्या पथकातील तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई जालना येथील पथकाने २८ डिसेंबरला दुपारी शहराजवळील कुर्ला रोडवर केली.
वनपाल शेषेराव सातपुते, वनरक्षक संतोष जाधव, चालक बिभीषण भालेराव अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही वनविभागाच्या फिरत्या पथकात कार्यरत आहेत. कुठलीही कारवाई न करता आरा यंत्रांच्या परवाना नूतनीकरणासाठी सॉ मिल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडे शहरातील २७ आरा यंत्र परवानाधारकांकडे प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ५४ हजार रुपयांची मागणी केली होती. पदाधिकाऱ्याचे स्वत:चे दोन सॉ मिल आहेत. त्यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तिन्ही कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पेठ बीड ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती. एसीबीचे औरंगाबाद येथील पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक एस. बी. पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर, अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमदाडे, गजानन कांबळे व अजय कांबळे यांनी ही कारवाई केली.
परवाना नूतनीकरणासाठी दोन हजारांचा रेट२७ डिसेंबरला सायंकाळी सरकारी पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. यात २७ आरा यंत्रांचे प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे ५४ हजार रुपये लाचेची मागणी झाली.
तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले२८ डिसेंबरला कुर्ला रोडवर दुपारी एक वाजता तक्रारदाराकडून वनरक्षक संतोष जाधव याने लाचेचे ५० हजार रुपये स्वीकारताच जालना येथील पथकाने झडप मारून तिघांनाही पकडले. या कारवाईने वनविभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला असून, एकाचवेळी तिघे सापळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.