अंबाजोगाई (बीड ) : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथमवर्ष विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेत अखील भारतीय आयुर्विज्ञान परीषदेने आता नव्याने ५० जागेची मान्यता दिली आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिल्या वर्षीच्या अभ्यासक्रमास १५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.
या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमता वाढवण्याच्या केंद्र शासनाच्या हेल्थ अँड फँमिली वेलफेअर मंत्रालयाच्या वतीने हालचाली सुरु झाल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे या महाविद्यालयास नव्याने १०० जागा वाढवण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. राज्यातील एकूण २० शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढवताना परिषदेने या वैद्यकीय महाविद्यालयाला या शैक्षणिक वर्षांपासून नव्याने ५० जागा वाढवल्या आहेत. यावाढीव जागामुळे यावर्षी प्रथमवर्षात १५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय हे वैद्यकीय शिक्षणासोबतच अत्यंत चांगली वैद्यकीय सेवा पुरवण्याबाबत महाराष्ट्रात नावारुपास आलेले वैद्यकीय महाविद्यालय आहे. सर्व सामान्य रुग्णांना अतिउच्च वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व त्यांचे सर्व विभाग प्रमुख व वैद्यकीय कर्मचारी सतत प्रयत्नरत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ५० ने वाढल्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात आता पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्ये समवेतच वैद्यकीय शिक्षकांसोबतच इतर वाढीव कर्मचारी, नवनवीन शासकीय इमारती आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा शासनाकडून उपलब्ध होणार आहेत. यासर्व सोयी-सुविधांमुळे अंबाजोगाई शहर आणि परीसरातील लोकांसोबतच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
अतिउच्च वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्नउपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक सामान्य रुग्णांना अतिउच्च वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न सर्व सहका-यांमार्फत केले जात आहे. यावर्षी पासून वाढीव ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी निश्चितच चांगला उपयोग होणार आहे.- डॉ. सुधीर देशमुख,अधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई