किल्लेधारूर (बीड ) : धारूर घाटातील ( Accident again in Dharur Ghat ) अरुंद रस्त्यामुळे पुन्हा एकदा अपघात झाला आहे. आज पहाटे अडीज ते तीन वाजेच्या दरम्यान लातूरहून जालनाकडे कच्चे तेल घेऊन जाणारा टँकर घाटातील वळणावर उलटला. यानंतर रस्त्यावर तेल सांडल्याने मार्गावरील वाहूतक ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्परतेने मार्ग बदलून वाहतूक सुरळीत केला. या मार्गावरील अपघाताची मालिका खंडित होत नसल्याने प्रवास्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
धारूर ते तेलगाव हा रस्ता खामगाव-पंढरपूर-548 सी या राष्ट्रीय महामार्गावर आहे. धुनकवड पाटी ते धारूर येथील डॉ. आंबेडकर चौक हा रस्ता नवीन झाला आहे. मात्र, रुंदीकरण न केल्याने हा रस्ता अपघात मार्ग झाला. अरुंद रस्ता आणि घातील अवघड यामुळे येथे सातत्याने अपघात होत आहेत. आज पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान धारूर घाटातून लातूरहून जालन्याकडे एक टँकर (क्र.एम एच04 एफ यु 8056) कच्चे तेल घेऊन जात होता. घाटात अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर डोंगराच्या बाजूने उलटला. यावेळी टँकरमधील कच्चे तेल रस्त्यावर अर्धा कि.मीपर्यंत वाहत गेले. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन पाटील घटनास्थळी पथकासह पोहचले. त्यांनी तत्काळ मार्ग बंद करून पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू केली. यानंतर अग्निशमन दलाने रस्ता धुऊन घेतला. तेलामुळे दुर्घटना होऊन नये यासाठी त्यावर माती टाकली. अपघात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, अरुंद रस्त्याने सातत्याने अपघात होत असल्याने रुंदीकरण तात्काळ करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.