धारूर ( बीड ) : बारामतीहून मध्यप्रदेशकडे साखर घेऊन जाणारा एक ट्रक बुधवारी मध्यरात्री धारूर घाटातील (Accident in Dharur Ghat) अवघड वळणावर अनियंत्रित होऊन दरीत कोसळला. यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
धारूर-तेलगाव रस्त्यावरील धारूर घाटात अपघात होणे नियमीतच झाले आहे. बुधवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान बारामतीहून ३०० क्विंटल साखर घेऊन एक ट्रक (क्र एम एच 34 बी जी 4615 ) मध्यप्रदेशात रायपूरकडे जात होता. घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कठडा तोडून खोल दरीत कोसळला. यात चालक भास्कर गजानन घुले, तुषार रविशंकर पोयाम, संजय चंद्रभान थावरे ( सर्व रा.वनी.जि.यवतमाळ ) तिघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच धारूर पोलीस स्टेशनचे एएसआय गोंविद बास्टे, चालक संतोष बहीरलवाल, पोहेका. विश्वनाथ भताने यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने तिन्ही जखमींना बाहेर काढत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी तिन्ही जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सहापोलीस पोलीस निरीरीक्षक नितीन पाटील यांनी अपघातस्थळाची पाहणी करून सूचना केल्या.
घाट रुंदीकरण कधी होणार ?दरम्यान, अरुंद रस्त्यामुळे घाटात सातत्याने अपघात होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सातत्याने अपघात होत असतानाही एमएसआरडीसीचे अधिकारी घाटातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळेच येथे अपघाताची श्रंखला खंडित होत नसल्याच्या संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.