बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळी येथे गुरुवारी सभा झाली, या सभेसाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभा संपल्यानंतर पोलिसांची व्हॅन बीडकडे येत होती, दरम्यान या गाडीचा रॉड तुटल्यामुळे परळी ते सिरसाळा रोडवर अपघात झाला. यात अपघातात 10 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
प्रधानमंत्री मोदींची सभा संपल्यानंतर बीडकडे येतांना सिरसाळा परिसरात पोलीस व्हॅनचा अचानक रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटला मात्र प्रसंगावधान राखत चालकाने व्हॅन झाडावर घातली. व्हॅन पलटी झाल्याने यामध्ये 10 जण जखमी झाले. यामध्ये चालक अशोक कदम व अमोल दयानंद राऊत , जिवा शिवाजी गंगावणे, आकाश सुदमराव यादव, भैय्यासाहेब विठ्ठलराव निसर्गने, वैजीनाथ खंडूजी तनपुरे,विजय कुंडलकर हे जखमी असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर राहुल घाडगे, सुशांत गायकवाड, शिवाजी राख हे या जखमींवर माजलगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील चालक कदम हे गंभीर जखमी आहेत. जिल्हा रुग्णालयात अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोनी. सुरेश खाडे, कुटुंब आरोग्य योजनेचे पोनि. आनंद थोरात यांनी धाव घेत जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. दरम्यान उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष यांनी सांगितले.