धारूर ( बीड) : भरधाव बस आणि दुचाकीची आज सकाळी साडेअकरा वाजता गावंदरा येथे समोरासमोर जोरदार धडक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. आबासाहेब राघू बडे ( ५५ ) असे मृताचे नाव असून ते गावंदरा गावचे पोलीस पाटील होते.
गावंदरा येथील श्रीराम घुले यांचे गुरुवारी निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी नातेवाईक आबासाहेब बडे आज सकाळी घुले यांच्या घरी गेले होते. येथून दुचाकीवर घराकडे परत येताना अचानक समोरून आलेल्या माजलगाव- कळंब बसची त्यांची समोरासमोर धडक झाली. यात आबासाहेब बडे यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, याचवेळी दुसऱ्या एका दुचाकीला याच बसचा धक्का लागल्याने गावंदरा येथीलच समाधान दत्तू बडे व रामेश्वर बडे हे किरकोळ जखमी झाले आहे. जखमींवर धारूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. या अपघात प्रकरणी बस चालका विरूध्द धारूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
आबासाहेब बडे हे गावंदरा गावचे पोलीस पाटील होते. त्यांच्यावर सायंकाळी गावंदरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे.