कडा : मागील पंधरा दिवसांत आष्टी तालुक्यातील तवलवाडी गावामध्ये ६० संकरित गाई ४० वासरे घटसर्प या आजाराने दगावल्याची घटना ताजी असतानाच, आता कड्यातही घटसर्पाने डोके वर काढले असून, कड्यात दोन दिवसांत सहा दुभत्या गाईंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून, एकीकडे दुधाचे भाव घसरल्याने दुग्ध व्यवसाय तोट्यात सुरू आहे. आष्टी तालुक्यातील कडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे गाई असून, दररोज जवळपास चार ते पाच हजार लीटर दूध संकलन या गावात केले जाते. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय अनेकांनी पसंत केला आहे, शिवाय शिक्षण घेऊनही नोकरी लागत नसल्यामुळे गावातील युवक वर्गाने मुक्त गायगोठा ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवून स्वयंपूर्ण होण्यासाठी दुग्ध व्यवसाय अंगीकारला आहे. त्यातच घटसर्प आजाराने गाई दगावल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मृत गाईंचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, घटसर्प असल्याचे निष्पन्न झाले आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश ढेरे यांनी कडा गावाला भेट देऊन ज्या शेतकऱ्यांच्या गाई मृत्युमुखी पडल्या त्यांचे सांत्वन केले. घटसर्प आजाराला रोखण्यासाठी पशुपालकांनी आपल्या गाईला स्वच्छ पाणी पाजावे, तसेच तिची निगा राखण्याचे आवाहन त्यांनी केले. मृत्यू झालेल्या गाईची खड्डा खोदून त्यात मीठ टाकून व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लावावी. इतर जनावरांना त्याचा संसर्ग होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले, तर पशुधनाच्या उपचारासाठी डॉ.बापुसाहेब शिंदे,डॉ.धोंडे,डॉ.खेडकर आदी परिश्रम घेत आहे.