केज : येथील एका सराईत गुंडांवर एमपीडीएनुसार (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) कारवाई करून, २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. आवेज उर्फ आवड्या खाजा शेख (१९, रा.कोकाचपीर, केज) असे त्या आरोपीचे नाव आहे.
आवेज उर्फ आवड्या शेख याच्यावर चोरी, घरफोड, मारामारीचे नऊ गुन्हे नोंद आहेत. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, केज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमाेडे यांनी गुन्हे शाखेचे पो.नि.सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्यामार्फत अधीक्षकांकडे आवेज शेखविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव दिला होता.
अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी त्यास मान्यता दिली. त्यानुसार, सपोनि.शंकर वाघमोडे, उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, अंमलदार अशोक नामदास, अनिल मंदे, अशोक गवळी यांनी २३ रोजी त्यास ताब्यात घेतले. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आलेली आहे.