लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव विचाराधीन होता. याला बुधवारी मान्यता मिळाली आहे. यासाठी १६५ कोटी रूपयांचा निधीही मंजूर झाला असून यामुळे बीड नगर परिषदेच्या माध्यमातून शहर विकासासाठी हातभार लागणार आहे. लवकरच याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमृत अभियानांतर्गत पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्यजलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्रांती यासारख्या पायाभूत सुविधा राबविल्या जात आहेत. त्यानुसार राज्यात ३२८० कोटींच्या आराखड्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्येच बीडच्या भुयारी गटार योजनेचा समावेश असून १६५ कोटी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र शासनामार्फत ८२ कोटी ९० लाख, राज्य आणि नगर परिषदेमार्फत प्रत्येकी ४१ कोटी ४५ लाख रूपयांचा समावेश आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची यंत्रणा यासाठी कार्यान्वित राहणार असून २४ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, रात्री उशिरा बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी या योजनेचा नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना थांगपत्ता नसल्याचा आरोप पत्रकाद्वारे केला आहे.पाच महिन्यांपासून पाठपुरावामागील पाच ते सहा महिन्यांपासून बीड नगर पालिकेकडून या योजनेच्या मंजूरीसाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर याला बुधवारी यश आले. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, अभियंता सतीश दंडे आदींनी यासाठी पाठपुरावा केला होता.
सांडपाण्यावर प्रक्रियाया योजनेंतर्गत सांडपाण्यावरही प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी २७ कोटी ३७ लाख ९९ हजार ४०० रूपयांच्या निधीची तरतूद आहे. तसेच कलेक्शन सिस्टिम झोनसाठी तब्बल १०१ कोटी ८३ लाख १ हजार ६०० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इतर विविध कामांसाठी करोडोंच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.