अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर येथे महापुरुषाच्या पुतळा विटंबनेचा प्रकार उघडकीस आला होता. तीन दिवसानंतर शुक्रवारी (दि.३०) रात्री या घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले. त्याच्यावर दाखल गुन्ह्यात ॲट्राॅसिटी कलमाची वाढ करून अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्या आरोपीस चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी (दि.२८) पहाटे बर्दापूर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. पोलीस ठाण्याजवळच घटना घडल्यामुळे पोलिसांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. ठिकठिकाणी आंदोलने सुरु झाली. बर्दापूरसह अंबाजोगाई शहरात एक दिवस बंद पाळण्यात आला. त्यामुळे या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे दडपण पोलिसांवर होते. अखेर तीन दिवस जंग जंग पछाडल्यानंतर आणि अनेक लोकांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बर्दापूर येथील सय्यद बशारत सय्यद बाबू (वय ४२) यानेच हा प्रकार केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले. शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्याला वडवणी जवळून अटक करण्यात आली. नशेत कृत्य केल्याची दिली कबुली :घटनेच्या दिवसापासून सय्यद बशारत हा फरार होता. त्याच्या विषयीचा संशय बळावल्याने पोलिसांनी सर्वत्र त्याचा शोध सुरु केला होता. तपासादरम्यान तो वडवणीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक लांजेवर, डीवायएसपी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक शिंदे यांनी पीएसआय जमादार, बीट अंमलदार रोडे आणि पो.ना. चेवले यांच्या पथकाला वडवणीकडे पाठविले. वडवणीपासून चार किमी अंतरावर सध्या काम सुरु असलेल्या एका वाॅटर प्लांटमध्ये लपलेल्या सय्यद बशारत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बर्दापूर येथे आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दारूच्या नशेत सदरील कृत्य केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सय्यद बशारत हा सध्या परळीत वास्तव्यास असतो. तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून लॉकडाऊन पासून तो बर्दापुरात राहण्यासाठी आला होता. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही आणि डॉग स्क्वाडची मदत :घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कुठलीही कसर न ठेवता तपास सुरु केला होता. घटना उघडकीस आल्यानंतर सर्वप्रथम पोलिसांनी डॉग स्क्वाडला पाचारण करून शोध घेतला असता श्वान सय्यद बशारत याच्या घराच्या जवळ जावून थांबले. त्यानंतर पोलिसांनी जवळच्या मोबाईल टॉवरचा सर्व तपशील घेत त्या काळात मोबाईलवर संभाषण केलेल्या सर्व ग्रामस्थांना बोलावून त्यांची चौकशी केली होती. शुक्रवारी काही तरुणांना बीडला नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. परंतु, त्यातून काही हाती लागले नव्हते. अखेर सीसीटीव्ही फुटेजमध्ये सय्यद बशारत याचा वावर पुतळा परिसरात असल्याचे दिसून आले होते. न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त :शनिवारी दुपारी बर्दापूर पोलिसांनी सय्यद बशारतला अंबाजोगाई जिल्हा व सत्र सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्या. सुरवसे यांनी त्याला ४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बर्दापूर येथील महापुरुषाच्या पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 3:50 PM
बुधवारी (दि.२८) पहाटे बर्दापूर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.
ठळक मुद्देवडवणीजवळ आवळल्या मुसक्याचार दिवसांची पोलीस कोठडी