बीड : क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांवर कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना १७ मे रोजी रात्री ११ वाजेदरम्यान बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली. या प्रकरणी आरोपीला पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपी फरार झाला होता. आरोपीचा शोध पोलिसांनी लावला असून, १९ मे रोजी सकाळी नागापूर खुर्द येथील नदीजवळील एका पडक्या घरातून त्याला अटक केली आहे.
परमेश्वर साळुंके असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे आणि मृत राम साळुंके (वय ५०) व लक्ष्मण यांच्यात १५ दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी हा वाद गावातच मिटवण्यात आला होता; परंतु १७ मे रोजी परमेश्वर याने राम व लक्ष्मण साळुंके या दोघांना फोन करून झालेल्या भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ केली. त्यानंतर परमेश्वराला समजावण्यासाठी व शिवीगाळ केल्याचे त्याच्या आई-वडिलांना सांगण्यासाठी सोमवारी (दि. १७) रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके हे दोघे भाऊ त्याच्या घराकडे निघाले होते. दरम्यान, आपल्या घरी ते दोघे येणार असल्याची माहिती परमेश्वरला मिळाली. राम व लक्ष्मण साळुंके यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीने परमेश्वर कुऱ्हाड घेऊन त्याच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावर दबा धरून बसला होता. राम व लक्ष्मण साळुंके दिसताच परमेश्वर साळुंके याने त्यांच्यावर अचानक त्यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. या हल्ल्यात दोघेही जागीच गतप्राण झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना दिली. तोपर्यंत आरोपी परमेश्वर साळुंके त्या ठिकाणावरून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली होती. १९ मे रोजी सकाळी आरोपी परमेश्वर साळुंके याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप, पोलीस हवालदार सानप,तसेच खरमाटे, पो.ह.ना. सुरवसे, पो.शि. कानडे, कारले, जाधव व चांदणे यांनी केली.
आरोपी फरार होण्याच्या तयारीत
आरोपी परमेश्वर साळुंके हा खून केल्यानंतर रात्री गावातील नदीपात्रात लपण्यासाठी गेला होता. त्यानंतर तहान लागली म्हणून तो घरी पाणी पिण्यासाठी आला. त्यावेळी आईने विचारलं असं का केलंस तर, तिलादेखील धमकी दिली. तसेच दुचाकी सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु, गाडी सुरू झाली नाही. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तो फरार होऊ नये यासाठी दुचाकीचा प्लग काढून घेतला. त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी १९ मे रोजी तो नदीपात्राजवळ असलेल्या एका पडक्या घरात पोलिसांना दिसला. लॉकडाऊनमुळे वाहने बंद आहेत; त्यामुळे पळून जाण्याचा प्रयत्न फसल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
आज करणार न्यायालयात हजर
आरोपीला आज, गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या खून प्रकरणामुळे मृताच्या कुटुंबीयांवर मोठा परिणाम झाला असून, गावात शोककळा पसरली आहे.