गेवराई : तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू महाराजाने स्वत:च्या मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर मठाधिपतीशिवाय हे अघोरी कृत्य होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्य आरोपी मठाधिपतीच असल्याचा आरोप करत फिर्यादी मठाधिपती यांना आरोपी करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली.कोळगाव येथील सूर्र्यनारायण मंदिरासमोरच येथून जवळच असलेल्या साठेवाडी येथील सुरेश महाराज धोत्रे यांनी जादूटोणा करीत त्यांच्या मयत मुलीच्या स्मरणार्थ बांगड्या, केस, लिंबू, साडी, चोळी, चप्पल, हळद, कुंकू आदी साहित्य पुरुन त्यावर समाधी उभारली होती.दरम्यान शुक्रवारी ग्रामस्थांनी हा प्रकार हाणून पाडत समाधी उद्ध्वस्त केली. यावेळी तणाव निर्माण झाल्याचे समजल्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि विजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पोलिसांसमक्ष समाधी उकरुन त्याखालील जादूटोणा साहित्य काढले होते. पोलिसांनी ते साहित्य जप्त केले.या प्रकरणी संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या फिर्यादीवरून सुरेश महाराज धोत्रे यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मात्र या प्रकरणाने कलाटणी घेतली असून या प्रकारात मठाधिपती हनुमान गिरी यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. पुढे कोणती कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारासूर्यमंदिर संस्थान भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र हनुमान महाराज गिरी हे मठावर अघोरी कृत्य करुन भाविकांच्या भावनांशी खेळत आहेत. हे कृत्य हे मठाधिपतींच्या परवानगीशिवाय शक्य नाही, यामध्ये त्यांचाच हात असून ते मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ चौकशी करुन मठाधिपतींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, नसता ग्रामस्थांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अॅड .उध्दव रासकर यांनी दिला आहे.
फिर्यादी मठाधिपतींनाच आरोपी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:13 AM
तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू महाराजाने स्वत:च्या मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर मठाधिपतीशिवाय हे अघोरी कृत्य होऊ शकत नाही.
ठळक मुद्देकोळगाव येथील सूर्यमंदिरावरील समाधी प्रकरण । ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप