बीड : जिल्ह्यात गाजत असलेल्या वक्फ जमीन घोटाळा प्रकरणांपैकी शहरातील शिवाजीनगर ठाण्यात दाखल असलेल्या ४०९ एकरच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. या प्रकरणात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील वक्फच्या शेकडो एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात भूमाफियांसह महसूलचे अधिकारी, कर्मचारी आरोपी आहेत. २९ डिसेंबर २०२१ रोजी शिवाजीनगर ठाण्यात जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुमा खलीखुजमा यांच्या तक्रारीवरून शहेनशाहवली दर्ग्याच्या ४०९ एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरण व खरेदी-विक्रीच्या व्यवहारप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. यात राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाची १५ कोटी रुपयांची रक्कम हडपण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा खटाटोप केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहेत. यातील उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह हबीबोद्दीन सिद्दकी, तत्कालीन तलाठी उद्धव हिंदोळे, पुरुषोत्तम आंधळे, परमेश्वर राख, शेज अश्फाक शेख गौसपाशा, वसंत मंडलिक यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायाधीश के. आर. पाटील यांच्यासमोर या प्रकरणात सुनावणी झाली. सुनावणीअंती सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.
अटकेच्या कारवाईची दाट शक्यताया प्रकरणात वक्फच्या जमिनी ज्यांनी खरेदी केल्या त्यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे. काही खरेदीदारांनीदेखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ‘आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाहून जमिनी खरेदी केल्या आहेत’, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयाने त्यांचाही जामीन फेटाळला. त्यामुळे अटकेची शक्यता वाढली आहे.