कडा (बीड) : आष्टी ठाण्यात चौकशीसाठी आणलेला अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना चकवा देत धुम ठोकली होती. हा आरोपी अद्यापही पोलिसांना सापडला नसल्याने आष्टी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच आरोपी फरार असतानाही आष्टी पोलिसांनी पीडितेला कसलेच संरक्षण दिले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील सुनिल डुकरे याने एका मुलीला चाकुचा धाक दाखवित अत्याचार केला होता. तसेच तिच्या आईलाही मारहाण केली होती. त्यानंतर आष्टी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी म्हणून ठाण्यात आणले. हातकडी लावून बसविले असता त्याने येथील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ठाण्यातून धूम ठोकली. ही घटना सोमवारी रात्री घडली होती. या बुधवारची सायंकाळ झाली तरी या आरोपीला पकडण्यात आष्टी पोलिसांना यश आले नव्हते. त्यामुळे आष्टी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या नातेवाईकांमधून होत आहे.आरोपीसह पीडितेचाही जीव धोक्यात?
आरोपी फरार असल्याने पीडितेच्या जीवालाही धोका आहे. सुडबुद्धीने त्याने काही गैरकृत्य करू नये, याची भिती तिच्या नातेवाईकांमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजुला आरोपी सुनिलचीही यामुळे मोठी बदनामी झाली आहे. त्यामुळे त्याने काही चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी आष्टी पोलिसांनी त्याला अटक करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
अद्याप आरोपी अटक नाही. लवकरच त्याला ताब्यात घेऊ. आम्ही तपास करीत आहोत. पीडितेच्या नातेवाईकांमधून मागणी न आल्याने आम्ही संरक्षण दिले नाही. त्यांना तसे काही वाटले तर आम्ही संरक्षण देऊ.एम.बी.सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आष्टी