बीड : ज्यादा व्याज दराचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी माउली मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लि. परळीचे चेअरमन व इतर संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपी फरार होते. या प्रकणातील आरोपीला औरंगाबाद येथील नक्षत्रवाडी परिसरातून अटक केली असून, ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने २२ जानेवारी रोजी केली.
ओमनारायण चंदनलाल जैस्वाल असे अटक केलेल्या चेअरमनचे नाव आहे. त्याने माउली मल्टीस्टेट क्रेडिड सोसायटी लिमिटेडमध्ये ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवले होते. दरम्यान, ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली होती. यावेळी ठरल्याप्रमाणे व्याजदर न देता दीड कोटी रुपयांची ठेवीदारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी अरुण हरिहर मुळे व इतरांनी गुन्हे दाखल केले होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जैस्वाल हा फरार होता. त्याचा शोध आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी घेत होते. मिळालेल्या माहितीच्या आधारावर औरंगाबाद येथील नक्षत्रवाडी येथील शुभलाभ ईन्क्लेव्ह या वसाहतीमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे पोनि सतीश वाघ यांच्या पथकाने केली.
सात दिवसांची पोलीस कोठडी
ओमनारायण जैस्वाल याला न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासात सर्व बाबी समोर येतील, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि. वाघ यांनी दिली.