बीड : जिल्हा रूग्णालयाच्या इमारतील आंबट चाळे करताना एका महिलेसह दोन पुरूषांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे पत्र रूग्णालय प्रशासनाने शहर पोलिसांना दिले. मात्र, येथील पोलीस निरीक्षकांकडून माझ्याकडे पत्र आलेच नाही, असे सांगितले. विशेष म्हणजे रूग्णालयाच्या पत्रावर शहर ठाण्यालापत्र मिळाल्याचा आवक शिक्का देखील आहे. केवळ समन्वय जुळत नसल्यानेच या तिघांना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे.
धक्कादायक ! चक्क जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीवर ‘आंबट चाळे’
जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ च्या छतावर मद्यप्राशन करून आंबट चाळे करताना एका वॉर्ड बॉयने पाहिले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रूग्णालयाची तक्रार आहे की नाही हे न विचारताच केवळ महिलेची तक्रार नाही, असे सांगून या तिघांनाही ‘लाख’ मोलाची मदत पोलिसांनी केली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. सुरक्षा रक्षकांना ठाण्यात पाठवून पत्रही दिले. मात्र, मंगळवारी काहीच कारवाई झाली नाही.
बुधवारी सकाळीच अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसलीच कारवाई झालेली नव्हती. उलट मोरे यांनी आपल्याला रूग्णालयाचे पत्रच मिळाले नसल्याचे सांगितले. तर रूग्णालयाने पत्रावर शहर पोलीस ठाण्याचे रिसिव्हड दाखविली आहे. यावरून येथील निरीक्षकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तर मनौधैर्य वाढेल..रूग्णालयाच्या इमारतीवर आणि रूग्णालयाच्याच मालकिचे साहित्य घेऊन आंबट चाळे करण्याची हिंमत त्या तिघांनी केली होती. त्यांच्यावर यावेळी कारवाई नाही झाली तर असे कृत्य करणाºयांचे मनोधैर्य वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिसांनी कारवाई करावी गुन्हा दाखल करण्यासाठी कर्मचारी व सुरक्षा रक्षक ठाण्यात गेले होते. त्यांनी जबाब घेतल्याचे सांगितले. पत्रही दिले असून त्याची रिसिव्हड आमच्याकडे आहे. छतावरील साहित्य जप्त करणार की आम्ही नष्ट करावे, याबाबतही आम्ही पत्र देत आहोत. उपअधीक्षकांशी बोलणे झाले आहे. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक
गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा रूग्णालयातील प्रकाराबद्दल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादी येताच गुन्हा दाखल केला जाईल.- विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक,बीड
अद्याप रुग्णालयाचे पत्र नाही माझ्याकडे रूग्णालयाचे कसलेच पत्र आलेले नाही. फिर्यादीला आम्ही बोलावून आणू शकत नाहीत. मी नुकताच पदभार स्विकारला आहे. - व्ही.बी.मोरे, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे बीड