अंबाजोगाई ( बीड ) : रेडिओद्वारे स्फोट घडवल्याच्या प्रकरणात आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी (रा. केंद्रेवाडी, ता. अंबाजोगाई) यास दोषी ठरवून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपी विरोधात कुठलाही सबळ पुरावा नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा खटला रद्दबातल ठरवत आबा उर्फ मुंजाबा गिरी याची निर्दोष मुक्तता केली आहे. ( accused free from much talked radio blast case)
काय आहे प्रकरण ?केंद्रेवाडी येथील आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी यांचे गावातीलच गोपीनाथ तरकसे यांच्यासोबत शेतीवरून भांडण सुरू होते. त्यामुळे तरकसे यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने आबा गिरीने नांदूरघाट येथील दत्ता जाधव यांच्याकडून जिलेटिन कांड्या घेऊन रेडिओ स्फोटचा कट रचला. मात्र, यात रेडिओचे पार्सल बसमध्येच राहिले अन् याचा मोह बसच्या वाहकाला आवरता आला नाही. तो रेडिओ घरी घेऊन गेला आणि स्फोटात त्याचे कुटुंब जखमी झाले. पोलिसांनी या स्फोटाचा तपास पूर्ण करून आबा गिरी याच्याविरुद्ध न्यायालयात 11 जानेवारी 2014 रोजी दोषारोपपत्र सादर केले. अंबाजोगाई येथे अपर सत्र न्यायाधीश आर. ए. गायकवाड यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे चोवीस साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी यास शिक्षा सुनावली. स्फोटासाठी लागणा-या जिलेटिनच्या कांड्या पुरवल्याचा आरोप असणा-या दत्ता साहेबराव जाधव यांच्या विरोधात सबळ पुरावा न मिळाल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आरोपीला मिळाला संशयाचा फायदादरम्यान, आबा गिरी यानेच रेडीओचे पार्सल बसमध्ये ठेवल्याचा पुरावा नाही, तसेच रेडीओमध्ये सेल टाकल्याबरोबर स्फोट होईल असे सर्किट तयार करण्याएवढा आरोपी तज्ञ नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने हा खटला रद्दबातल करून आबा गिरी याची मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले.
30 नोव्हेंबर 2012 रोजीचा स्फोटकेज तालुक्यातील काळेगाव घाट येथे 30 नोव्हेंबर 2012 रोजी रेडिओचा भीषण स्फोट झाला होता. ग्रामीण भागातील या स्फोटामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. बाँबशोधक पथक, एटीएसचे पथक काळेगावात दाखल झाले होते. या स्फोटाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले होते.
तीन किलोमीटर परिसरात स्फोटाचा आवाजएसटीच्या अंबाजोगाई आगारात ओम रमेश निंबाळकर (32, रा. काळेगाव घाट, ता. केज) वाहक म्हणून कार्यरत होते. निंबाळकर व चालक बी. व्ही. पाटील (रा. धानोरा, ता. अंबाजोगाई) गुरुवारी (29 नोव्हेंबर) अंबाजोगाई ते कुर्ला बस (एमएच 20 बीएल 2055) घेऊन गेले होते. शुक्रवारी (30 नोव्हेंबर) सकाळी 7.30 वाजता अंबाजोगाईला परतले. बसने 11 वाजेच्या सुमारास अंबाजोगाई- लातूर फेरीदेखील केली. कामकाजाची वेळ संपल्याने चालक पाटील धानोरा येथे, तर निंबाळकर काळेगाव घाटला जाण्यास निघाले. आगारात जमा करण्याआधी निंबाळकर यांनी बसची तपासणी केली. त्यांना बेवारस खोके आढळले होते. निंबाळकर यांनी आगारात जमा करण्याऐवजी ते घरी नेले होते. त्यात रेडिओ निघाला. रेडिओमध्ये सेल टाकताच दुपारी दीड वाजता जोरदार स्फोट झाला होता. यात त्यांचा दोन वर्षांचा मुलगा कुणाल घराबाहेर फेकला गेला व घराचे पत्रेही उडून गेले होते. परिसरात तीन कि.मी. परिसरात स्फोटाचा आवाज गेला होता. दुर्घटनेत वाहक निंबाळकर (32), पत्नी उषा (26), आई कुसुमबाई (60), मुलगा कुणाल गंभीर जखमी झाले होते.
बेवारस पार्सल घरी नेणे महागात पडले- बसमधील बेवारस पार्सल आगारात जमा न करता घरी घेऊन जाणे निंबाळकर कुटुंबीयांना महागात पडले.- या स्फोटात ओम रमेश निंबाळकर यांचे दोन्ही हात निकामी झाले. परिणामी त्यांना नोकरी गमवावी लागली.- पत्नी उषा हिला पाय गमवावे लागले.- चार वर्षांचा मुलगा कुणाल याला दोन्ही डोळे गमवावे लागले.- आई कुसुमबाई यांच्या नशिबी वृद्धापकाळात अपंगत्व आले.
घटनाक्रम :- 29 नोव्हेंबर 2012 बसमध्ये पार्सल ठेवले- 30 नोव्हेंबर 2012 वाहक ओम निंबाळकरने पार्सल बसमधून घरी नेले- 30 नोव्हेंबर 2012 काळेगाव घाट येथे राहत्या घरी पार्सलमधील रेडिओ स्फोट- 15 मार्च 2013 आरोपी आबा गिरी याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल- 30 एप्रिल 2014 अंबाजोगाई न्यायालयाने आबा गिरीला जन्मठेप सुनावली- तुरुंगातून सुटीवर गेलेला आबा गिरी फरार- 24 नोव्हेंबर 2019 फरार आबा गिरीला पुण्यातून अटक- 16 जुलै 2021 उच्च न्यायालयाने खटला रद्दबातल केला, आबा गिरीची मुक्तता