कडा ( बीड ) - भरदिवसा गावातीलच एका तरूणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून चारचाकी गाडीतून पळवले होते. याची वाच्यता होताच त्याने मुलीला परत सोडून पळ काढला. आष्टी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्यापही आरोपी मोकाटच आहे. आरोपीच्या अटकेबाबत आष्टी पोलिसांकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत आहेत, आरोपीला अटक करून न्याय मिळाला नाही तर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा पिडीतेच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील एका अल्पवयीन मुलीला गावातीलच राहुल शितोळे या तरूणाने मंगळवारी दि. 2 मार्च रोजी दुपारी फुस लावून चारचाकी वाहनात बसवून पळविले होते. या घटनेची वाच्यता झाल्याने आरोपीने कडा-धामणगांव रोडवर मुलीला सोडुन पळ काढला. यानंतर पिडीतेच्या कुटुंबीयांनी आष्टी पोलिस ठाण्यात तसा गुन्हा त्याच दिवशी दाखल केला. मात्र, दहा दिवसानंतरही आरोपी मोकाटच आहे. त्याच्या अटकेबाबत विचारपूस केली असता आष्टी पोलिस उडवाउडवीचे उत्तरे देतात अशी माहिती पिडीतेच्या कुटुंबीयांनी दिली. आरोपीला अटक करून न्याय मिळाला नाही तर पोलिस अधिक्षक याच्या कार्यालयासमोर उपोषणा करणार असल्याचा इशारा पिडीतेच्या नातेवाईकांनी दिला आहे. याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने आष्टी पोलिसांचा तपास सुरू आहे.