केज-कळंब रस्त्यालगतच्या साळेगाव ते माळेगाव दरम्यान तुकाराम गुंठाळ यांच्या गव्हाच्या शेतात कळंब येथील पुनर्वसन सावरगाव जि. उस्मानाबाद येथील एक २८ वर्षे वयाच्या तरुणाचा १५ फेब्रुवारी सोमवार रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
लखन सोनवणे याच्या खून प्रकरणी आरोपीने घटनास्थळावर कोणताच पुरावा ठेवला नसल्याने आरोपीस पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद झोटे आणि विजय आटोळे यांनी अत्यंत गुप्तपणे सर्व माहिती काढून तपास केला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स याच्या आधारे आरोपी निष्पन्न केला; मात्र आरोपीने खून करताच तो पुणे येथे फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सीमा कोळी, बाळासाहेब दराडे, तुळशीराम जगताप, खेडकर, क्षीरसागर, संजय जायभये, बालासाहेब ढाकणे, मेहेत्रे व खनपटे यांनी तपास करून यातील आरोपी साईनाथ जयसिंग गायकवाड (रा. पुनर्वसन सावरगाव, कळंब) याला पुण्यातील आकुर्डी येथून अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.