बीड : मजुरीचे पैसे मागण्यास गेलेल्या तरुणावर छेडछाडीचा आळ घेतला. त्यानंतर संतप्त जमावाने पाठलाग केल्याने तरुण जीवाच्या आकांताने धावत सुटला. मात्र, त्यास माय-लेकाने पाठलाग करून अमानुष मारहाण केली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा थरार राक्षसभुवन (ता. गेवराई) येथे ४ मे रोजी घडला. मयत तरुण जालना जिल्ह्यातील रहिवासी असून, चकलांबा पोलिसांनी माय-लेकास जेरबंद केले आहे.
संदीप पिराजी मारकड (२५, रा. साष्टपिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना), असे मयताचे नाव आहे. त्याचा भाऊ गणेश पिराजी मारकड याच्या तक्रारीनुसार, संदीप अविवाहित असून, ऊसतोडीचे काम करायचा. गावातीलच विष्णू संदीप बोचरे यांच्याकडे सात दिवस त्याने ऊस तोडणीचे काम केले. मजुरीच्या पैशासाठी तो विष्णू बोचरेकडे चकरा मारायचा. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ होत होती. ४ मे रोजी दुपारी ३ वाजता तो विष्णू बोचरे यांचा मुलगा सूरजकडे पैशासाठी गेला होता. त्याची आत्या तेथे होती. संदीपने चिडून तिचा हात पकडून सूरज कोठे आहे, असे विचारले. त्यामुळे तिचा गैरसमज झाला. तिने छेडछाडीचा आरोप करत आरडाओरड सुरू केली. यावेळी इतर स्थानिक लाेक जमा झाले.
यावेळी गणेश मारकड हादेखील तेथे पोहोचला. यावेळी सूरज व त्याची आई गंगूबाई विष्णू बोचरे हे तेथे पोहोचले. त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संदीप मारकड घाबरला व राक्षसभुवनच्या दिशेने पळू लागला. सूरज व गंगूबाई या मायलेकासह इतरांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मारहाणीत जखमी झालेल्या संदीप मारकडला जालना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्याने औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविले. तेथे उपचारादरम्यान त्याचा ५ रोजी मृत्यू झाला. ६ मे रोजी गणेश मारकड याच्या तक्रारीवरून सूरज विष्णू बोचरे व गंगूबाई विष्णू बोचरे यांच्यावर चकलांबा ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
दुचाकी अडवून काठीने मारहाणसंदीप तावडीत सापडू नये, यासाठी भाऊ गणेशने मित्राकरवी दुचाकी पाठवली. मात्र, राक्षसभुवनजवळ गाठून त्यास काठीने मारहाण करून संपविले.
तीन दिवसांची पोलीस कोठडीआरोपी माय-लेकास ६ मे रोजी चकलांबा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांना ७ मे रोजी गेवराई न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सपोनि भास्कर नवले यांनी दिली.