७ सप्टेंबर रोजी नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर कुकर्म केल्याप्रकरणी बाळू पवारविरुद्ध गुन्हा दाखल झाला; मात्र तो फरार झाला. त्यास ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. बाळू पवार हा आरोपी पाॅजिटिव्ह निघाल्याने ८ ऑक्टोबर रोजी त्याला बीडहून शिरूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले होते;मात्र ११ ऑक्टोबर रोजी पाऊस व अंधाराचा फायदा घेत रात्रीच तो पसार झाला होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, तो अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे ऊस तोडणीचे काम करत असल्याची गुप्त माहिती शिरूर पोलिसांना मिळाली. पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी या कामगिरीची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पवार यांच्यावर सोपवली. उपनिरीक्षक पवार, पोलीस नाईक हनुमंत साळुंके, भाऊसाहेब आहेर यांनी बर्दापूर गाठले. अति सावध राहत रामचंद्र पवार यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोविड सेंटरमधून पसार आरोपी चार महिन्यानंतर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:31 AM