बीड : पवने तिहेरी हत्याकांडात आरोपी असलेल्या एकाचा टीबी आजाराने जीव घेतला. बीड जिल्हा कारागृहातून त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाचा या आरोपीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मयताचे दोन्ही मुले सध्या कारागृहात बंदी आहेत.
किसन काशिनाथ पवने (वय ७१ रा.आनंदवन सोसायटी, बीड) असे मयत आरोपीचे नाव आहे. २९ जुलै २०१९ रोजी किसनसह त्याचा डॉक्टर मुलगा सचिन व वकिल कल्पेश यांना सोबत घेऊन सख्या भावासह पुतण्याचा खून केला होता. याच गुन्ह्यात हे सर्व जण तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत होते. जिल्हा कारागृहात हे तिघे बंदी असतानाच किसन याला टीबीसह इतर आजार जडले. त्याला तात्काळ आगोदर जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतू नंतर तेथून अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल केले.
जवळपास दीड महिन्यापासून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तो रूग्णालयातच दाखल होता. चार दिवसांपूर्वी डॉक्टरांना त्याला सुटी करून पुन्हा रूग्णालयात पाठविले. परंतू कारागृह प्रशासनाने त्याला अवघ्या तासाभरातच पुन्हा रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. या प्रकराची कारागृह प्रशासन आणि आरोग्य विभागाने नोंद करीत पुढील कारवाई केली.