बीड : येथील कोविड केअर सेंटरमधून पलायन केलेल्या दरोड्याच्या गुन्हयातील सराईत आरोपीस बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले आहे. पोलिसांनीअटक केलेल्या आरोपीवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
आरोपीस दरोड्याच्या तयारीत असताना साथीदारांसह अटक करण्यात आले होते. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी तो पॉझिटिव्ह आल्याने त्यास शहरातील आयटीआय सेंटर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याने 25 जुलै रोजी पोलिसांची नजर चुकवून बाथरूमचे गज तोडून पळ काढला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना झाली होती. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन आरोपी हा डोनगाव टाका (ता.पाचोड जि.औरंगाबाद) येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करुन प्रयत्न सुरु केले. त्यावेळी तेथील आरोपी गायरानात दिसून आला. त्याने पोलिसांना पाहून पळ काढला, त्याचा 10 ते 12 किलोमीटर पाठलाग करुन त्यास शिताफीने पोलिसांनी पकडले. त्यांनतर शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.