बीड : सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत हातभट्टी तयार करून विक्री करणाऱ्या आरोपीवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर आरोपीची रवानगी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.
आसाराम देवबा गायकवाड (रा. सिरसाळा ता. परळी) असे हर्सूल कारागृहात रवानगी केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर हातभट्टी विक्रीचे ७ गुन्हे दाखल आहेत. सिरसाळ्याजवळील गोवर्धन हिवरा रोडलगत गायरानात तो हातभट्टी दारू तयार करून परिसरात विक्री करत होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी अवैध धंदेवाल्यांविरुद्ध एमपीडीए कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सिरसाळा ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी माजलगावचे उपअधीक्षक सुरेश पाटील यांच्यामार्फत पोलीस अधीक्षकांकडे जानेवारी २०२१ मध्ये कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला होता. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी हा प्रस्ताव १३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारी रोजी गायकवाडवर एमपीडीएनुसार कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर सिरसाळा पोेलिसांनी आसाराम गायकवाडला ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात पाठविले. गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, सिरसाळा ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रीकांत डोंगरे, उपनिरीक्षक जनक पुरी, गुन्हे शाखेचे जमादार अभिमन्यू औताडे यांनी ही कारवाई केली.
गुन्हे दाखल झालेल्यावर होणार कारवाई
एका आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तरी, देखील त्याच्या कृत्यात बदल होत नसेल तर, त्यांच्यावर ‘एमपीडीए’कायद्यान्वे कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. त्यानुसार पुढील काळात देखील आवैध धंदेवाल्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.