लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यातून निर्दोष मुक्तता करावी, माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, असा अर्ज आरोपी वाल्मीक कराड याने न्यायालयात केला आहे. त्यावर सीआयडीचे म्हणणे न्यायालयाने मागितले आहे, २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत कराड याच्या अर्जावर म्हणणे मांडले जाईल, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
सीआयडी म्हणणे मांडणारबीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी गुरुवारी झाली. त्यानंतर ॲड. निकम यांनी माध्यमांना माहिती दिली. आरोपी वाल्मीक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती, ती न्यायालयात सादर केली. वाल्मीक याने या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्याचा अर्ज न्यायालयास सादर केला आहे. पुढील सुनावणीत सीआयडी आपले म्हणणे मांडेल, असे निकम म्हणाले.
आरोपीचा खुलासा नाहीआरोपी वाल्मीक याची चल-अचल मिळकत जप्त करावी, असा अर्ज आम्ही न्यायालयात दिला आहे. त्या अर्जावर अद्याप वाल्मीकतर्फे खुलासा सादर करण्यात आलेला नाही. मकोकाखाली वाल्मीकची प्रॉपर्टी जप्त करावी, असा अर्ज सीआयडीने न्यायालयास दिला आहे. आराेपीने निर्दोष मुक्तीसाठी अर्ज दिल्याने त्यावर सुनावणी होईल. पुढे सरकारतर्फे आम्ही एक ड्राफ्ट चार्ज देऊ, सदरील चार्ज फ्रेम करावी की नाही यावर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय निर्णय घेईल, असेही निकम म्हणाले.