बीड : क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रिक्षात बसवून, नव्हे कोंबून नेणा-या २७ रिक्षांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाया करण्यात आल्या. या कारवाईने सर्वसामान्यांत समाधान व्यक्त होत असले तरी रिक्षाचालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रूपाली साळवे (१३) या विद्यार्थिनीचा रिक्षातून पडून मृत्यू झाल्यानंतर ‘लोकमत’ने २५ नोव्हेंबर रोजी ‘जीवघेणा शाळा प्रवास’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून विद्यार्थ्यांची ने-आण करणाºया रिक्षांचा आढावा घेतला होता. यामध्ये बहुतांश रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबून बसविल्याचे उघड झाले होते.
त्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी सोमवारी सकाळपासूनच कारवाईची मोहीम हाती घेतली. यावर काही रिक्षाचालकांनी जिल्हाधिका-यांकडे धाव घेतली; परंतु नियमबाह्यपणे रिक्षा चालवीत विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू पाहणा-या रिक्षाचालकांचा हा संताप सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त करणारा आहे.... तर जबाबदार कोण?कारवाईनंतर रिक्षाचालकांनी संताप व्यक्त करणे साहजिकच असले तरी सिरसाळ्यासारखी एखादी दुर्घटना घडल्यावर त्याला जबाबदार कोण, असा सवालही पालक वर्गातून उपस्थित होते. त्यामुळे रिक्षाचालकांची नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणीही होत आहे.