गेवराई : तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असलेल्या गंगावाडी येथे नदी पात्रात अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती येथील तहसीलदार यांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे ६ च्या सुमारास नदी पात्रात एक हायवा, दोन ट्रॅक्टर, रोटर असे जवळपास ४० लाखांचे साहित्य जप्त करून कारवाई करण्यात आली.
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली. तालुक्यात गोदावरी नदी पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळूचा बेसुमार उपसा सुरू असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, नवीन जिल्हाधिकारी येताच अवैधरीत्या वाळू वाहतूक रोखण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार तालुक्यातील गंगावाडी येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावरून येथील तहसीलदार सचिन खाडे यांनी महसूलमधील तलाठी व कोतवाल यांना सोबत घेत, रविवारी पहाटे ५ च्या सुमारास गंगावाडी नदी पात्रात धाव घेतली. या वेळी वाळू उपसा व वाहतूक सुरूच होती. दरम्यान, या वेळी एक हायवा, दोन ट्रॅक्टर, रोटर असे जवळपास ४० लाखांचे साहित्य जप्त करून कारवाई करण्यात आली. या वेळी सर्व साहित्य येथील तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. ही कारवाई तहसीलदार सचिन खाडे, तलाठी बाळासाहेब पखाले, गोविंद ढाकणे, जितेंद्र लेंडाळ, माणिक पांढरे, ससाणे, सोन्नरसह अनेक जण उपस्थित होते. तसेच तलवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही या कारवाईत सहभाग घेतला.