गेवराई (जि. बीड) : तालुक्यात होणारा वाळूचा अवैध उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस आणि महसूल विभाग कामाला लागले असून वाळूमाफियांविरुद्ध फास आवळला जात आहे. सावरगाव येथील गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणारे आठ ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने तर महसूलच्या पथकाने बागपिंपळगाव परिसरात वाळूसह ट्रक जप्त केला. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव येथील नदीपात्रात बेकायदेशीर वाळू भरणारे आठ ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाला आढळले व पथकाने या कारवाई करत वाळूने भरलेले चार ट्रॅक्टर तर वाळू भरत असताना चार ट्रॅक्टर असे आठ ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही कारवाई एस.पी पथकाचे प्रमुख विलास हजारे, मोटे, भिल्लारे, गेवराईचे पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ आदींनी केली.
‘महसूल’च्या पथकाची कारवाईगेवराई तालुक्यातील बागपिंपळगावकडे अवैध वाळू उपसा करून एक ट्रक येत असल्याची माहिती मिळाल्यावरून शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तहसीलदार सचिन खाडे, तलाठी निकाळजे, तलाठी बाळासाहेब पखाले यांच्या पथकाने सापळा लावला. राष्ट्रीय महामार्ग ५२ वर उभा असलेला ट्रक पकडला. यात बेकायदेशीर उपसा केलेली तीन ब्रास वाळू होती. वाळू व ट्रक, असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा पकडलेला ट्रक कारवाईसाठी येथील तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.