गेवराई : तालुक्यातील पाचेगाव शिवारातील वनविभागाच्या हद्दीत प्रवेश करून विना परवाना रस्ता बनवुन व १३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत लावलेल्या रोपांचे नुकसान केल्याप्रकरणी आय.आर.बी. चे ७ टिप्पर व एक जेसीबी असा दोन कोटी २५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वनविभाग व गस्त पथकाने शनिवारी केली.
तालुक्यातील पाचेगाव शिवारात वनविभागाचे वनक्षेत्र आहे. या क्षेत्रात शुक्रवार रोजी आय.आर.बी कंपनीने वनविभागाची परवानगी न घेता वनक्षेत्राची हद्द तोडुन या वनक्षेत्रातुन विनापरवाना रस्ता बनवून वाहतुक सुरू केली होती. तसेच वनविभागाने ७४३ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी लावलेल्या ७०० रोपांचे या वाहतुकीमुळे नुकसान झाले. तसेच विनापरवानगी रस्ता बनवला म्हणून वनविभागाच्या व गस्त पथकाच्या पथकाने शनिवार रात्री आठ वाजेच्या सुमारास पाचेगाव शिवारात कारवाई केली. यात ७ सात टिप्पर व एक पोकलेन जप्त केले.
ही कारवाई विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली एल.बी दिवाने, वन अधिकारी शिवाजी कांबळे, देविदास गाडेकर, व्ही.एस.मोरे, येवले, पवार, औचर तसेच गस्त पथकाचे अशोक काकडे, पी.के.कांबळे, चिमटे, जाधव ,कोकणे, पक्षे, नवनाथ जाधव, फरतारे आदींनी केली. याप्रकरणी आय.आर.बीचा गुत्तेदार राज राकेश चव्हाण (सूरत ह.मुक्काम जालना रोड बीड) याच्याविरोधात भारतीय वन अधिनियम कलम १९२७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.