परळी : कपडे खरेदी करायचे आहेत, दुकान चालू आहे का? अशी विचारणा करताच दुकानदाराने प्रवेश दिल्यानंतर ग्राहक बनून गेलेल्या तहसीलदारांनी पाहणी करून येथील एका कापड दुकानदाराविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर पुढे जात नाही तोच दुसऱ्या रेडीमेड कापड दुकानात ग्राहकांना सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणीही दंडात्मक कारवाई केली. दोन्ही दुकाने सील करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन चालू असताना दोन कापड दुकाने उघडी ठेवून गर्दी जमवून व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. येथील तहसीलदार सुरेश शेजुळ व शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे व त्यांच्या पथकाने शहरात लॉकडऊनची पाहणी केली. सामत क्लाॅथ स्टोअर्स येथे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी कपडे खरेदी करायचे आहेत, दुकान चालू आहे का? अशी विचारणा केली असता चालकाने चक्क दुकान उघडून शेजुळ व त्यांच्या पथकाला खरेदीसाठी आत घेतले. आत गेल्यावर आठ ते १० ग्राहक कपडे घेत असल्याचे आढळून आले. तहसीलदारांनी पहिल्या व तिसऱ्या मजल्यांवर दुकानाची पाहणी केली. या कार्यवाहीसाठी तहसीलदार शेजुळ यांनी शासकीय गाडी न वापरता साधी गाडी व चालक म्हणून तलाठी विष्णू गित्ते यांना सोबत घेतले होते. तेथील कार्यवाही करून थोडे पुढे जाताच अजय रेडिमेड स्टोअर्स या दुकानात ग्राहक आत सोडताना उघडे दिसून आले. त्या ठिकाणी पाहणी केल्यावर चार ते पाच ग्राहक खरेदी करताना आढळून आले. त्याच क्षणी नगरपालिका प्रशासनास बोलावून दुकाने सील करण्यात आली. या पथकात तहसीलदार सुरेश शेजुळ, सहायक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, अशोक खरात, तलाठी विष्णू गित्ते हे सहभागी होते. त्यानंतर नगरपालिका कार्यालयीन प्रमुख संतोष रोडे यांना बोलावून दोन्ही दुकानास पावती देऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली.
===Photopath===
260521\26_2_bed_8_26052021_14.jpg
===Caption===
लॉकडाऊनमध्ये व्यापार : परळीत दोन कापड दुकाने सिल