दिंद्रुड ( बीड ) : जिल्ह्यातील नाकलगाव येथील एका हातभट्टी चालकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई कारवाई करण्यात आली आहे. मच्छिंद्र न्यानोबा जाधव असे आरोपीचे नाव असून दिंद्रुड पोलिसांनी त्याला जेरबंद करून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या सूचनेवरून दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर यांनी दिनांक 31 आॅगस्ट रोजी नाकलगाव येथील मच्छिंद्र न्यानोबा जाधव यांचे विरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी राहुल रेखावार यांना सादर केला होता.
मच्छिंद्र जाधव याच्या विरुद्ध पोलीस ठाणे दिंद्रुड येथे हातभट्टी दारू जवळ बाळगणे, चोरटी विक्री करणे, हातभट्टी तयार करणे, गुळ मिश्रित रसायन बाळगणे व त्यापासून दारू बनवणे अशा स्वरूपाचे नऊ गुन्ह्यांची नोंद दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर आहे. त्यापैकी आठ गुन्हे न्यायप्रविष्ट असून एक गुन्हा पोलीस तपासावर आहे. मच्छींद्र जाधव हा हातभट्टी दारू तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याने पोलिसांची त्याच्यावर करडी नजर होती. त्याच्यावर यापूर्वी सीआरपीसी कलम 110 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु,त्याने कारवाईस न जुमानता हातभट्टी दारूची विक्री सुरूच ठेवली होती. आरोपीच्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दि. ८ रोजी त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईचे आदेश दिले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत व दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर यांनी नाकलगाव येथून मच्छिंद्र जाधव यास ताब्यात घेऊन दि. ९ रोजी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले.